न्युयॉर्क - एरवी आपण फेसबुक, ट्विटर आणि जीमेल अकाउंट हॅक झाल्याचे ऐकतो. मात्र, आता या बलाढ्य कंपन्यांच्या मालकांचेही खाते हॅक व्हायला लागले आहेत. एका हॅकर्स ग्रुपने ट्विटरचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोरसी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले. 'चकलिंग स्कॉड' असे या हॅकर्स ग्रृपचे नाव आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅक; पाठवले अश्लील व्हिडिओ
जॅक डोरसी यांना ट्विटरवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तब्बल २० मिनीटांपर्यंत हॅकर्स डोरसी यांच्या खात्यावर जातीयवादी आणि ज्यू लोकांविरोधी मजकूर पसरवत होते. त्यांनी सॅनफ्रान्सीस्को येथील ट्विटरचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धकमीही दिली. अमेरिकेतील कृष्णवर्णियांबद्दलही भेदभाव करणारा मजकूर लिहला. तसेच जगात विध्वंस घडवून आणण्याबाबत मजकूर पोस्ट केला.
हेही वाचा - ऑनलाईन बँकखाते हॅक करून नागरिकांची फसवणूक; गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद
खाते हॅक झाल्याचे कळाल्यानंतर हा मजकूर काढून घेण्यात आला. याआधीही २०१६ मध्ये डोरसी यांचे खाते हॅक झाले होते. त्यावेळी 'आवरमाईन' नावाच्या हॅकर्स ग्रुपने त्यांचे खाते हॅक केले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी कसलाही जातीवादी मजकूर पोस्ट केला नव्हता, आम्ही फक्त ट्विटरवची सुरक्षा व्यवस्था किती मजबूत आहे, हे पाहत होतो, असे म्हटले होते. चकलिंग स्कॉड या हॅकर्स ग्रुपने इतरही काही महत्त्वाच्या लोकांचे खाते हॅक केल्याचे बोलले जात आहे.