वॉशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी, शरिरात अँटीबॉडीज निर्माण करण्याकरिता मोफत उपचार देण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. विस्कॉन्सिन येथे एका प्रचार सभेला ते संबोधित करत होते.
'माझ्यावर जी उपचार पद्धत अवलंबण्यात आली. तेच उपचार अमेरिकन नागरिकांसाठी देशातील विविध रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच 'ट्रम्प सुपर रिकव्हरी' तर 'बाय़डेन डिप्रेशन' हे दोन पर्याय तुमच्याकडे आहेत. बायडेन जिंकले तर कोरोना परिस्थिती आणखी बिघडेल. अमेरिकेचे प्रचंड नुकसान होईल, असेही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांच्यावर वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. कोरोना झाल्याने त्यांच्या प्रचार सभा रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनातून बरे झाल्यानंतर आता पुन्हा ट्रम्प हे अतिशय आक्रमकपणे आपल्या प्रचारा दौऱ्यांचं वेळापत्रक आखताना दिसत आहेत.