वॉशिंग्टन डी. सी. - नव्या वर्षात अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थलांतरीतांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिल्या जाणारा एच-1 बी व्हिसावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी आणली होती. ही बंदी 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू होती. या बंदीत ट्रम्प यांनी वाढ केली असून 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापुढे एच-1 बी व्हिसा हवा असणाऱ्या लोकांना मार्च 2021 संपेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. एच-1 बी व्हिसाच्या नियमातील बदलाने केवळ योग्य लाभार्थींना लाभ मिळेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. बेरोजगारीचा दर, राज्यातील व्यवस्यावर महामारीसंबधित प्रतिबंध आणि जूनपासूनचे कोरोना संक्रमण याचा हवाला स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी दिला आहे. परदेशातून अमेरिकेत विविध कामांसाठी जाणाऱ्या अस्थायी स्वरूपाच्या व्हिसावरही बंदी आणली आहे.
काय आहे एच 1 बी व्हिसा -
अमेरिकन कंपन्यांकडून स्थलांतरित नसलेल्या विदेशातील कर्मचाऱ्यांना एच1बी व्हिसा देण्यात येतो. विशेषत: तांत्रिक गोष्टीत तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना एच 1बी व्हिसा देण्याचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील अनेक तंत्रज्ञान कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीत घेण्यासाठी चीन आणि भारतातील मनुष्यबळावर अवलंबून असतात.
बायडेन यांच्या जाहीरनाम्यात आश्वासन -
एच- वन बी व्हिसा मुद्दा बायडेन प्रशासनाच्या इमिग्रेशन रिफॉर्मचा हिस्सा असेल. दरम्यान येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल की, हे सर्व निर्णय एक-एक करून घेतले जातात की एकाचवेळी घेतले जातात. बायडेन कॅम्पेनच्या पॉलिसी डॉक्युमेंट अनुसार, आधीपासूनच अमेरिकेत राहून काम करणाऱ्या लोकांचा उच्च कौशल्य अस्थायी व्हिसा काढून घेऊ नये. जर इमिग्रेशन सिस्टम उच्च कौशल्य असणाऱ्या कामगारांना काढून केवळ एंट्री-लेव्हलच्या कामगारांना प्रोत्साहन दिल्यास अमेरिकेच्या इनोवेशन आणि प्रतिस्पर्धेला धोका निर्माण होऊ शकतो.