वॉशिंग्टन (डीसी) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्टला बाईटडान्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी गुरुवारी राजीनामा दिला. दरम्यान, केविन मेयर यांच्या जागी जनरल मॅनेजर व्हेनेसा हंगामी सीईओ म्हणून काम पाहणार आहेत.
केविन मेयर यांनी राजीनामा देताना कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. 'गेल्या काही आठवड्यापासून राजकीय वातावरण बदलले आहे. कंपनीत जे बदलाव करण्याची गरज होती, ते मी केले. अत्यंत जड अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे', असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
टिकटॉकचे अमेरिकेत 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षांच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करून 6 ऑगस्टला बाईटडान्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात टिकटॉकने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी 14 ऑगस्टला कार्यकारी आदेश काढून बाईटडान्सला अमेरिकेतील गुंतवणूक काढण्याचा 90 दिवसांची मुदत घालून पर्याय दिला आहे.