नॅशव्हिले : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यादरम्यानची तिसरी आणि शेवटची अध्यक्षीय डिबेट (वादविवाद) टेनिसीमध्ये आज पार पडली. निवडणुकीला अवघे १२ दिवस राहिले असताना होत असलेल्या या वादविवादाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
कोरोना महामारीने सुरूवात..
कोरोना महामारीला तुम्ही कसे लढा द्याल असा प्रश्न विचारत मॉडरेटर क्रिस्टन वेल्कर यांनी या वादविवादाला सुरुवात केली. कोरोनामुळे अमेरिकेतील लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर, तब्बल दोन लाख २५ हजार लोकांचा बळी गेला आहे. एवढ्या लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणारी व्यक्ती अध्यक्षपदावर असू नये, असे मत बायडेन यांनी व्यक्त केले. तर, ट्रम्प यांनी आपण कोरोनाला चांगल्या प्रकारे लढा देत असल्याचे म्हटले. आपल्या सरकारने जे उपाय लागू केले, ते नसते केले तर मृतांचा आकडा आणखी मोठा असू शकला असता, असे ट्रम्प म्हणाले.
यावेळी बायडेन यांनी लॉकडाऊनवर भर दिला. तसेच, कोरोनाला आळा घालण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट योजना असल्याचे सांगत, ट्रम्पकडे मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचा आरोप बायडेन यांनी केला. तर, आपण देश बंद ठेऊ शकत नाही, आपल्याला कोरोनासोबत जगून कार्यालये आणि शाळा सर्व उघडावेच लागतील असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सुरक्षा..
राष्ट्रीय सुरक्षेबाबत बोलताना, या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या बाहेरील देशांना त्याची किंमत चुकवावी लागेल असे बायडेन यावेळी म्हणाले. तर, बायडेन यांना रशियाकडून साडेतीन दशलक्ष डॉलर्स मिळाले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
त्यानंतर बायडेन यांनी ट्रम्पवर अशा आरोप केला, की त्यांनी अमेरिकेत भरलेल्या कराहून ५० पट अधिक कर चीनमध्ये भरला आहे. हा आरोप करत बायडेन यांनी ट्रम्पना आपल्या करांची बिले जाहीर करण्याचे आव्हान दिले.
याला प्रत्युत्तर म्हणून ट्र्म्प यांनी बिडेन यांच्या मुलाच्या युक्रेनमधील व्यवसायाचा मुद्दा वर काढला.
चीन आणि उत्तर कोरिया..
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तुम्ही चीनला धडा शिकवाल का? असे विचारले असता, बायडेन म्हणाले की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्ही चीनला उत्तर देऊ. तर, ट्रम्प यांनी ओबामा आणि बायडेन यांच्यावर चीन आणि उत्तर कोरियाशी संबंध बिघडवल्याचा आरोप केला.
बायडेन यांनी ट्रम्प आणि किम जोंग यांच्या मैत्रीवर आक्षेप घेत, ट्र्म्प एका गुंडाशी मैत्री करत असल्याचा आरोप केला. तर, ट्र्म्प म्हणाले की आपण केवळ दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.
अमेरिकेतील गरीबी आणि अफोर्डेबल केअर अॅक्ट..
अमेरिकेतील गरीबी आणि वैद्यकीय सुविधेसाठी ट्रम्प काहीही करत नसल्याचा आरोप बिडेन यांनी केला. तर, याबाबतची विधेयके विरोधक मंजूर होऊ देत नसल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे होते.
वर्णद्वेष आणि वाद..
अमेरिकेतील वर्णभेदाबाबत विचारणा केली असता, बिडेन म्हणाले की ट्रम्प हे वर्णद्वेषाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत. तर, ट्रम्प यांन हे आरोप फेटाळून लावत बिडेन आणि ओबामा यांनी पहिल्यापासूनच कृष्णवर्णीय लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले.
हवामान बदल..
हवामान बदलाला कसे सामोरे जाल याबाबत विचारणा केली असता, बायडेन म्हणाले की अमेरिकेला तेलापासून मिळणाऱ्या इंधनाऐवजी पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे ठरणार आहे. तर, या मुद्द्यावरुन ट्रम्प यांनी मग टेक्सास, ओक्लाहोमा आणि पेन्सिल्वेनिया या तेल उत्पादन करणाऱ्या राज्यातील लोकांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला.