न्यूयॉर्क - नासाच्या कॅसिनी अंतराळ यानाच्या माहितीचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी शनी आणि त्याचा चंद्र टायटन यांचा अभ्यास केला. शनीचा चंद्र टायटन अगोदर उपलब्ध असलेल्या माहितीपेक्षा शंभर पट वेगवान असल्याचे नवीन संशोधनात समोर आले आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात शनीची निर्मिती झाली, याबाबत शास्त्रज्ञांना माहिती आहे. मात्र, शनीभोवती असणारी कडी आणि त्याचे ८० उपग्रह केव्हा तयार झाले याबाबत अनिश्चितता आहे. शनीचा उपग्रह असलेला टायटन सध्या शनीपासून 1.2 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. त्याच्या शनीपासून दूर जाण्याचा वेग पाहता असे लक्षात येते की, एकेकाळी तो शनीच्या खूप जवळ होता. शास्त्रज्ञांच्या कल्पनेपेक्षाही जास्त वेगात सूर्यमालेचा विस्तार झाला आहे.
हे नवीन संशोधन शनी आणि त्याच्या उपग्रहांच्या निर्मितीबाबत आणखी एक नवे कोडे होऊन बसले आहे, असे मत दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱया व्हॅलेरी लेन यांनी दिली.
टायटन त्याच्या कक्षेत फिरत असताना जेव्हा शनीच्या जवळ असतो तेव्हा शनीच्या पृष्ठभागावर तात्पुरता फुगवाटा निर्माण होतो. कालांतराने या फुगवट्याचे रुपांतर प्रतिबलामध्ये होऊन ते टायटनला शनीपासून आणखी दूर ढकलण्याचे काम करते. पृथ्वीचा चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटी मीटर दूर जातो. मात्र, टायटनचा शनीपासून दुर जाण्याचा वेग एका वर्षाला ११ सेंटीमीटर आहे, असे लेन यांनी सांगितले.