पेरू - कोरोनाच्या लढ्यात जगभरातील संशोधकांनी सर्वच पातळ्यावर प्रयत्न सुरू केले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या अँटीबॉडीबाबत (अँटीबॉडी) पेरुमधील संशोधक नवा अभ्यास करणार आहेत. या संशोधनात लामा या प्राण्यातील अँटीबॉडीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या विषाणूवर मात करणाऱ्या अँटीबॉडीचा जगभरातील संशोधक शोध घेत आहेत. अँटीबॉडी या प्रथिनांपासून बनलेल्या असतात. त्यांच्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते. ते विषाणुला चिकटतात, त्यातून विषाणूचे अस्तित्व संपवितात. त्यामुळे संशोधक अशा अँटीबॉडीचा शोध घेत आहेत.
यापूर्वी पेरुमधील संशोधकांनी एड्स आणि फ्ल्यूच्या रोगांसाठी लामा प्राण्यांतील अँटीबॉडीवर संशोधन केले होते. बेल्जियममधील संशोधकही लामामधील प्रतिपिंडवर संशोधन करत आहेत. त्यांनी प्रयोगशाळेत संशोधन केले असता लामाच्या प्रतिपिंड या सार्स आणि मर्स या विषाणूविरोधात लढण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. कोरोना महामारीचा जगभरात उद्रेक होत असताना अद्याप मानवाला पूर्णपणे प्रतिकारक्षमता तयार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कोरोनाचे जगभरात आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, लामा हा उंटासारखा दिसणारा दक्षिण अमेरिकेत आढळणारा प्राणी आहे. त्याची लोकर ही अत्यंत मऊ असते.