व्हँकुव्हर - पंजाबमध्ये जन्म झालेल्या राज चौहान यांची कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. हे पद धारण करणारे ते पहिले भारतीय आहेत.
1973मध्ये ते लुधियानाजवळील गौहर या गावातून कॅनडाला गेले. चौहान यांनी यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. ते न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे (एनडीपी) पाच वेळा आमदार राहिले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत 87 सदस्यांच्या सभागृहात त्यांनी 57 जागा जिंकून सत्ता कायम राखली.
'सन्मानाने आनंदीत'
सोमवारी शपथ घेतल्यानंतर चौहान यांनी सांगितले, "या सन्मानाने मला किती आनंद वाटतो, हे सांगणे कठीण आहे. ही भावना अद्याप अनुभवलेली नाही. देशाबाहेरील एखाद्या सभागृहाचे अध्यक्षपद भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळाल्याची कदाचित ही पहिलीच घटना आहे. मी आभारी आहे.
'योगदान महत्त्वाचे'
पुढे ते म्हणाले, "१९७३मध्ये मी प्रथम कॅनडाला आलो होतो, तेव्हा मी अजिबात विचार केला नव्हता, की एक दिवस निवडणूक लढवेन. आमचा समाज खूप छोटा आहे. त्यावेळी वंशवादही मोठ्या प्रमाणात होता. आज मी एक ध्येय साध्य केले आहे, यात समाजबांधवांचे मोठे योगदान आहे."
'विषमता नष्ट होण्यासाठी करणार प्रयत्न'
"मी माझे जीवन व्यक्तींना त्यांचे हक्क मिळावे, भेदभाव नष्ट व्हावा, विषमता दूर व्हावी यासाठी व्यतीत केली. आता विधानसभेच्या माध्यमातून निष्पक्ष पद्धतीने काम करून ब्रिटीश कोलंबियाच्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.