वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये जुलै महिन्यात तब्बल ९७ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशन यांनी संयुक्तपणे केलेल्या एका सर्वेक्षणात हे समजले आहे.
शिनुहा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये ९७ हजार ७८ नव्या बाल कोरोना रुग्णांची नोंद झाली. १६ जुलै ते ३० जुलैपर्यंत यामध्ये अधिक वाढ दिसून आली.
अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख ३८ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, प्रत्येक एक लाख कोरोना रुग्णांमागे ४४७ लहान मुलांची नोंद होते आहे. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी सुमारे ११ टक्के लहान मुले होते. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सुमारे १८ टक्के रुग्ण लहान मुले आहेत.
तसेच, कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांच्या संख्येपैकी ०.८ टक्के लहान मुलांचे आहेत. या अहवालानुसार, अमेरिकेतील लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी आहे असे या अहवालात समोर आले आहे.