वॉशिंग्टन : न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी ट्रम्पना खडे बोल सुनावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर, जेम्स यांनी ट्रम्प यांच्यावर नाराजी जाहीर केली आहे. देशातील जनता आपला अध्यक्ष निवडते, आणि लोकांची जी इच्छा आहे ती मान्य केली जाईल, असे त्या यावेळी म्हणाल्या.
ट्रम्प हे वारंवार भडकाऊ, भ्रामक आणि भेदभाव निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. मात्र, मी देशातील जनतेला हे सांगू इच्छिते की, प्रशासनाने या निवडणुकीचे आयोजन निष्पक्षपणे आणि सुरक्षित पद्धतीने केले आहे. देशभरातील सर्व वैध मतांची मोजणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहे. ज्याप्रमाणे यापूर्वी निवडणुका पार पडत आल्या आहेत, त्याचप्रमाणे ही निवडणूकही होत आहे, असे जेम्स म्हणाल्या.
मतदार अध्यक्ष निवडतात; अध्यक्ष मतदार नव्हे...
ट्रम्प यांनी यापूर्वी बायडेन या निवडणूक प्रक्रियेत घोटाळा करत असल्याचा आरोप केला होता. तसेच, सर्व ठिकाणचे मतदान थांबवले गेले पाहिजे, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली होती. सगळीकडचे मतदान थांबवून मतमोजणी केल्यास आपणच जिंकू, असा दावाही त्यांनी केला होता. यावर जेम्स म्हणाल्या, की आपल्या देशात मतदार आपला अध्यक्ष निवडतात, अध्यक्ष मतदारांची निवड करत नाही!"
हेही वाचा : जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्पना धक्का; न्यायालयाने याचिका फेटाळल्या