वॉशिंग्टन - एका दिवसात 1.25 लाख कोरोना रुग्ण नोंदवून अमेरिकेने 24 तासांतील जगातील सर्वाधिक प्रकरणांची नोंद केली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, 24 तासांत इतके रुग्ण सापडणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, शुक्रवारी देशात 1 लाख 25 हजार 596 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेत 1 लाखाहून अधिक रुग्ण सापडले.
कोविड ट्रॅकिंग प्रोजेक्टनुसार, सध्या अमेरिकेत 54 हजारहून अधिक रुग्ण रुग्णालयांत दाखल आहेत. यापैकी 11 हजार आयसीयूमध्ये आहेत, त्यामुळे मृत्यूंची संख्या आणखी वाढू शकते.
हेही वाचा - अमेरिकेत 8 लाख 50 हजारहून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह
तज्ज्ञांनी काही महिन्यांपूर्वी या अंदाजाची भविष्यावाणी केली होती. जूनमध्ये, जेव्हा दररोज 40 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत होते, तेव्हा वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, ही संख्या दिवसाला एक लाखापर्यंत पोहोचू शकते असा अंदाज यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीजचे संचालक अँथनी फौची यांनी वर्तवला होता.
कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 13 राज्यात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोलोरॅडो, इलिनॉय, इंडियाना, आयोवा, मेन, मिनेसोटा, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, नॉर्थ डकोटा, ओहियो, ओक्लाहोमा, यूटा आणि वेस्ट व्हर्जिनियाचा समावेश आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यापेक्षा 38 राज्यांमध्ये अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. अमेरिकेत या 24 तासांत 1 हजार 137 मृत्यू झाले आहेत. यासह देशातील एकूण मृतांची संख्या 2 लाख 36 हजार 25 झाली आहे.
हेही वाचा - कफाचा एक थेंब 6.6 मीटर पर्यंत प्रवास करू शकतो : अभ्यास