वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने पुन्हा देशाचा गौरव वाढवणारे काम केले आहे. नासाने 'बेनू' नावाच्या लघुग्रहावर पाठवलेले अंतराळयान 'ओसिरिस-रेक्स' (Osiris-Rex) याने सुरक्षित लँडिंग केले असून, तेथील खडकांचे नमुने देखील जमा केले आहेत. जपाननंतर अशी कामगिरी करणारा अमेरिका दुसरा देश ठरला आहे.
नासाच्या यानाने किती प्रमाणात बेनूवरील नमुने जमा केले आहेत, याची निश्चत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, यानाने पाठवलेली छायाचित्रे आणि चित्रफिती पाहता, संशोधनासाठी लागणारे पुरेसे नमुने रेक्सने जमा केले आहेत. नासाच्या या मोहिमेमधून आम्ही एक प्रकारे लघुग्रहावर तोडफोडच केली आहे. यामुळे संशोधनाला खूप फायदा होणार आहे, असे या मोहिमेचे प्रमुख व अरिझोना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डान्टे लुरेटा यांनी सांगितले.
अशा प्रकरे नमुने गोळा करण्याचा अमेरिकेचा पहिलाच प्रयत्न आहे. चार वर्षांपूर्वी नासाने रेक्स हे अंतराळयान केप कार्निवलयेथून रॉकेटसह लाँच केले होते. दोन वर्षांपूर्वी यान बेनू लघुग्रहावर पोहचले होते. या अगोदर जपानने दोनदा लघुग्रहावरून तेथील नमुने जमा करण्यात यश मिळवले आहे.
बेनूवरवरील वातावरणात कार्बनचे प्रमाण जास्त असून त्याच्या अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीची निर्मिती आणि उत्क्रांतीविषयी जास्त माहिती मिळणार आहे. रेक्सने पाठवलेल्या चित्रफिती पाहता नमुने गोळा करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे. बेनूवरून पृथ्वीवर येण्यास रेक्स मार्च महिन्यात उड्डाण करेल व २०२३मध्ये उटाहच्या वाळवंटात उतरेल, अशी माहिती नासाच्या थॉमस जुर्बेचन यांनी दिली.