केप कार्निव्हल (फ्लोरिडा) - अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाचा (NASA) 'पर्सिव्हरन्स' हा रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरला. मंगळ ग्रहावरील नागंरी रंगाच्या आकाशाला कवेत घेत उपग्रहाने अवघड असे लँडीग केले. हा रोव्हर आता मंगळ ग्रहावर प्राचिन जीवसृष्टीचा धांडोळा घेणार आहे. मंगळावरील दगड मातीचे नमुने हा रोव्हर पृथ्वीवर घेवून येणार आहे. पूर्वी या ग्रहावर जीवसृष्टी होती का? या प्रश्वाची उकल होण्यास मदत होणार आहे.
काळजाचा ठोका चुकवणारे ते अकरा मिनिटे
रोव्हर यशस्वीरित्या मंगळावर उतरताच कॅलिफोर्नियातील पॅसिडिना येथील नासाच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष केला. टाळ्या वाजवात, एकमेकांना हस्तांदोलन करत विजयोत्सव साजरा केला. पर्सिव्हन्स हा रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर त्याने पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला संदेश पाठवला. मात्र, हा संदेश पोहचण्यास सुमारे साडेअकरा मिनिटांचा वेळ लागला. या अकरा मिनिटात शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे झळकत होती. मात्र, संदेश प्राप्त होतात, सर्वांनी टाळ्या वाजवत आनंद साजरा केला.
अत्याधुनिक हायटेक पर्सिव्हरन्स रोव्हर -
पर्सिव्हरन्स हा अत्याधुनिक रोव्हर असून नासाने पहिल्यांदाच असा हायटेक रोव्हर मोहिमेवर पाठवला आहे. अमेरिकेने याआधी ८ मंगळ मोहिमा पार पाडल्या असून ही नववी मोहिम होती. एका चारचाकी कार एवढ्या आकाराचा हा रोव्हर आहे. तो प्लुटोनियमच्या इंधनावर चालतो. मंगळवारील जेझरो क्रेटर म्हणजेच एका खड्ड्याजवळ रोव्हर उतरला आहे. याठिकाणी प्राचिन नदी असल्याचे बोलले जाते. हा भाग खडकाळ, डोंगळार, कड्या कपारींचा असून रोव्हर या भागाचा अभ्यास करून पृथ्वीवर माहिती पाठवणार आहे.
चीन, युएईचीही मंगळ मोहिम -
मागील आठवड्यात युएई आणि चीनचे उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहचले. पर्सिव्हरन्ससह तिन्ही मोहिमा मागील वर्षी जून महिन्यात राबविण्यात आल्या. कारण या काळात पृथ्वी आणि मंगळातील अंतर सर्वात कमी असते. त्यामुळे कमी वेळात उपग्रह मंगळावर पोहचला.