नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. शांतता, सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांसह विविध क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याास कटीबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले. जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उभय नेत्यांत चर्चा झाली.
मोदींचे ट्विट -
'बायडेन यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. हवामान बदलाच्या संकटावर मिळून काम करण्यावर आमचे एकमत झाले. प्रादेशिक प्रश्न आणि दोन्ही देशांच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा झाली, असे ट्विट मोदींनी केले. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी येत्या काळात दोन्ही देशातील रणनितीक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मोदी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जानेवारीला जो बायडेन यांनी पदभार स्वीकारला. अमेरिकेमध्ये सत्तांतर होण्याच्या वेळी ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घातला. तर पदभार स्वीकारताच बायडेन यांनी ट्रम्प यांच्या अनेक निर्णयात बदल केला. मात्र, चीनविरोधी धोरणात अद्याप कोणताही बदल केला नाही. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही बायडेन सरकारने अधिकृत वक्तव्य जारी केले आहे.