मेक्सिको सिटी : मेक्सिको देशाच्या राजधानीमध्ये मेट्रोचा पूल तुटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये सुमारे १५ लोक ठार झाले असून, ७०हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी ३४ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेयर क्लाऊडिया शेनबौम यांनी याबाबत सांगितले.
ट्रेन कोसळली रस्त्यावर..
पूल तुटल्यामुळे वरुन जाणारी मेट्रो थेट रस्त्यावर कोसळली. यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला. या अपघाताचे कित्येक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रस्त्यापासून सुमारे पाच मीटर उंचीवर असलेला हा पूल तुटल्यामुळे ट्रेन खालून जाणाऱ्या गाड्यांवर कोसळली. कित्येक लोक यांनंतर ढिगाऱ्याखालून इतरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
बचावकार्य सुरू; मात्र विचित्र अपघातामुळे अडथळे..
सोमवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, लटकलेली ट्रेन जोपर्यंत क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात येत होती, तोपर्यंत बचावकार्य थांबवावे लागले होते. रेल्वेमध्ये तेव्हाही कित्येक लोक अडकले होते, मात्र ते जखमी होते की मृत याबाबत माहिती नसल्यामुळे अधिक खबरदारी बाळगावी लागत होती, असे मेयर क्लाऊडिया यांनी सांगितले.
मेक्सिको सिटी मेट्रोवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात..
आजचा अपघात अतिशय दुर्दैवी असल्याचे मत देशाचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्राड यांनी व्यक्त केले. मेट्रोच्या १२ क्रमांकाच्या लाईनवर हा अपघात झाला. या लाईनबाबत आधीपासूनच बऱ्याच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मेक्सिको सिटी मेट्रोने आतापर्यंत दोन मोठे अपघात पाहिले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये दोन रेल्वेंच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर ४१ प्रवासी जखमी झाले होते. त्यापूर्वी, २०१५मध्ये एक रेल्वे वेळत न थांबल्यामुळे दुसऱ्या ट्रेनला धडकली होती, यामध्ये १२ प्रवासी जखमी झाले होते.
हेही वाचा : इस्राईलच्या बॉनफायर फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; कित्येक जणांचा मृत्यू, १००हून अधिक जखमी