वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या विजय झाला आहे. त्यामुळे बायडेन यांच्या 'रनिंग मेट' म्हणजेच उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस याचाही विजय झाला आहे. उपराष्ट्रध्यपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार आहेत. पेशाने वकील असणाऱ्या कमला यांचे भारताशी निकटचे नाते आहे.
कमला हॅरिस भारतीय- आफ्रिकन वंशाच्या असून त्यांचे आजोळ तामिळनाडूत आहे. लहानपणीचा बराच काळ कमला हॅरिस यांनी तामिळनाडूत घालवला आहे. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांच्या आई श्यामला गोपालन या मुळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या. श्यामला यांचे पती आफ्रिकन वंशाचे होते. श्यामला गोपालन या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. परदेशात राहत असताना आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कमला यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर कमला हॅरिस आणि त्यांची बहीण माया दोघीजणी आईकडे राहत होत्या.
'माझ्या आईने माझे आणि माझ्या बहिणेचे संगोपन केले. ती निर्भीड महिला होती. बर्याचदा वेळा लोक तिच्याकडे दुर्लक्ष करीत असत किंवा तिला गंभीरपणे घेत नव्हते किंवा तिच्या भाषा उच्चारणामुळे, तिच्या बुद्धिमत्तेबद्दल गोष्टी गृहीत धरल्या जात. मात्र, प्रत्येक वेळी माझ्या आईने त्यांना चुकीचे सिद्ध केले, असे कमला हॅरिस यांनी प्रचार कार्यक्रमात सांगितले होते.
आजोबांचा प्रभाव...
कमला हॅरीस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या तामिळनाडूतील घरी येत. कमला यांचे आजोबा सनदी अधिकारी होते. 'माझे आजोबा भारतातील प्रमुख स्वतंत्र सेनानींपैकी एक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते चैन्नईमध्ये राहत. तेव्हा दररोज सकाळी समुद्र किनारी फिरायला जात. तेव्हा राजकारण, भ्रष्टाचार, न्याय अशा विषयांवर ते चर्चा करत. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे माझ्यात प्रामाणिकपणा आणि सत्यभावना निर्माण झाली', असे कमला हॅरिस यांनी 2009 मध्ये एका प्रचार कार्यक्रमात सांगितले होते.
निवडणुकीतून घेतली होती माघार...
यावर्षी जानेवारीत कमला हॅरिस यांनी अध्यक्षीय स्पर्धेतून माघार घेतली होती. माझ्याकडे प्रचार सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे मी निवडणूकीमधून माघार घेत आहे. मात्र, मी सदैव जनतेसाठी लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षीय निवडणूकीत जो बिडेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अमेरिकेच्या इतिहासात उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. यापूर्वी अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाच्या गेराल्डाइन फरेरो (1984) आणि रिपब्लिकन पक्षाच्या सारा पॅलिन (2008) यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.
कमला यांनी हार्वर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी मिळवलेली आहे. 1990 च्या सुमारास कमला हॅरीस यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेसिनेटमधील अनेक हाय-प्रोफाइल समित्यांवर काम केले आहे. कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.