वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेनमध्ये उद्या (बुधवार) पहिली अध्यक्षीय चर्चा ( प्रेसिडेंशियल डिबेट) होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री नऊ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी 6.30 वाजता) ही डिबेट सुरू होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे, की दोन प्रतिस्पर्धी समोरा-समोर असतील परंतु दोघे हात मिळवणार नाहीत. यावेळी दोन्ही उमेदवार चेहऱ्यावर मास्क वापरणार नाहीत.
केस वेस्टर्न यूनिवर्सिटी, क्लीवलँड (ओहियो)मध्ये 90 मिनिटे चालणाऱ्या या वादविवादाचे (डिबेट) चे सूत्रसंचालन फॉक्स न्यूज वाहिनीचे प्रसिद्ध अँकर ख्रिस वॉलेस करतील. डिबेटसाठी सहा विषय निवडण्यात आले आहेत. दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी, सुप्रीम कोर्ट, कोरोना व्हायरस, अर्थव्यवस्था, हिंसा आणि निवडणुकीतील पारदर्शकता असे मुद्दे चर्चेस असतील. प्रत्येक विषयाला १५ मिनिटे दिली जातील. यावेळी आरोप-प्रत्यारोप ही जोरदार होतील.यावेळी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात मुकाबला होत आहे. दोन्ही नेत्यांची दुसरी डिबेट फ्लोरिडातील मियामीमध्ये आयोजित केली जाईल. त्याचबरोबर तिसरी डिबेट 22 ऑक्टोबर रोजी टेनेसी शहरात होणार आहे.
अमेरिकेतील समस्यांबाबत ट्रम्प व बिडेन यांच्याकडे कोणते धोरण आहे,याची माहिती जनतेला या डिबेटमधून मिळेल.देशात वर्णद्वेशी दंगली, कोसळणारी अर्थव्यवस्था त्याचबरोबर कोरोनामुळे दोन लाखांच्या वर नागरिकांचा मृत्यू झाला असून आर्थिक मंदीमुळे लाखो जणांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. हे मुद्दे प्रामुख्याने चर्चेत असतील.