वॉशिंग्टन डी.सी - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 290 इलेक्ट्रोल व्होट्स त्यांना मिळाली असून अमेरिकेत आता नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे. राष्ट्रध्यक्षपदाचे नवे कारभारी जो बायडेन यांनी आज आपल्या विक्रमी विजयानंतर देशाला संबोधीत केले. यावेळी त्यांनी स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. नागरिकांनी आम्हाला स्पष्ट विजय मिळवून दिला. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रध्यक्षपदाचा उमेदवार तब्बल 74 दशलक्ष मतांनी विजयी झाले आहे, असे ते म्हणाले.
जो बायडेन यांनी ट्रम्प यांना मतदान करणाऱ्यांना एक संधी मागितली आहे. देशाचे विभाजन नाही, तर एकजूट होऊन राहू. मला लाल आणि निळी राज्ये नाही. तर अमेरिका दिसते. ज्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना मतदान केले. मी त्यांची निराशा समजू शकतो. आता आपण एकमेकांना संधी देऊया. मतभेद बाजूला ठेवण्याची, तणाव कमी करण्याची आणि एकमेकांना पुन्हा संधी देण्याची ही वेळ आहे, असे बायडेन म्हणाले.
आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्याग करावा लागतो परंतु त्यात आनंद आणि प्रगती आहे. कारण आपल्याकडे चांगले भविष्य घडविण्याची शक्ती आहे, असेही ते म्हणाले.
बायडेन यांनी विजयानंतर केलेल्या पहिल्या टि्वटमध्ये, 'अमेरिकेच्या जनतेने राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी निवड केली. हा मी माझा बहुमान समजतो. अमेरिकेपुढे असलेल्या आव्हांनाना मी तुमच्या साथीने सामोरं जाईन. तुम्ही मला ज्या विश्वासाने या ठिकाणी बसवलं आहे तो विश्वास सार्थ करेन', असे म्हटले होते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले होते. आता त्यांचा पराभव झाल्याने आगामी काळात भारत आणि अमेरिका संबंध कशाप्रकारे कायम राहतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.