वॉशिंग्टन - इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. तो संपूर्ण इराकमधील अमेरिकेच्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती आणि लष्करी उच्चपदस्थांवर हल्ला करण्याचे कट रचत होता, असा दावा अमेरिकेने केला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशांनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे पेंटॅगनने म्हटले आहे.
सुलेमानी याच्यासह इराकी बिगरलष्करी सेनेचा कमांडर अबु महदी अल-मुहान्दीस हाही या हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेने नियोजनपूर्वक या दोघांवर कारवाई केल्यामुळे मध्यपूर्वेत मोठे उलटफेर घडून येणार आहेत. तसेच, या घटनेबद्दल इराणकडून अमेरिकेचा भयंकर सूड उगवला जाण्याची शक्यता आहे. याला मध्यपूर्वेतील इस्रायल आणि अमेरिकाविरोधी शक्तींचा पाठिंबा असेल, यात काहीही शंका नाही.
इराकमधील पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्स (PMF - जमवाजमव करून तयार केलेले बिगरलष्करी सशस्त्र गट) प्रसिद्ध आहेत. हे सर्व गट इराणच्या कुदस फोर्स या बिगरलष्करी संघटनेच्या सशस्त्र पाठिंब्याने तयार झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी बगदादवर झालेल्या हल्ल्याला अमेरिकेला जबाबदार धरले आहे. त्यानंतर पेंटॅगननेही राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशांनुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.
इराणनेही आपले बिगरलष्करी सशस्त्र संघटनेतील आणि इराणशी इमान असलेले दोन नेते मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्ये कातैब हिज्बुल्लाहच्या एका नेत्याचा समावेश आहे. याच नेत्याचा इराकमध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यात हात होता, असेही इराणने म्हटले आहे.
कोण होता जनरल कासीम सुलेमानी?
कासीम सुलेमानी हा इराणच्या सशस्त्र क्रांतिकारी संघटना कुदस फोर्सचा म्होरक्या होता. अमेरिकेने या संघटनेला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना इराण रिव्हॉल्युशनरी गार्डस या संघटनेचा एक भाग आहे. कुदस फोर्स ही संघटना लेबनीज हिज्बुल्लाह, हमास आणि गाझा पट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवरील पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद, येमेनी हौथी, इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानातील शिया बिगरलष्करी सशस्त्र गटांना पाठिंबा देते. या संघटनेचे १० ते २० हजार सदस्य आहेत. मात्र, या संघटनेचा नेमका अवाका किती आणि त्यात किती जण गुंतले आहेत, याची अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नाही.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या हवाई हल्ल्याविषयी सांगितले. ठार झालेला अबू महदी अल-मुहान्दीस एका शिष्टमंडळासह या विमानतळावर आला होता. हे शिष्टमंडळ विमानतळावर कासीम सुलेमानी याच्या स्वागतासाठी आले होते. लेबेनॉन किंवा सीरिया येथून सुलेमानी विमानातून बगदादला आला होता. तो विमानातून उतरून मुहान्दीस आणि त्याच्या शिष्टमंडळाला भेटत असतानाच हा हवाई हल्ला झाला. हल्ल्यात हे सर्वजण मारले गेले.
ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देत आहेत. सुलेमानी याच्या अंगठीवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. कारण, सुलेमानी याच्या मृत्यूची आधीही अनेक अफवा उठली होती. २००६ मध्ये वायव्य इराणमध्ये एक विमान कोसळले होते. तसेच, दमास्कसमध्ये २०१२ झालेल्या बॉम्बवर्षावातही सीरियन सर्वेसर्वा बशर अस्साद याचे अनेक अधिकारी मारले गेले होते. या दोन्ही वेळेस सुलेमानी ठार झाल्याच्या अफवा उठल्या होत्या.
अगदी नजीकच्या काळात म्हणजे २०१५ मध्ये सीरियात अलेप्पो येथे राष्ट्राध्यक्ष अस्सादच्या बाजूने लढताना सुलेमानी मारला गेल्याच्या किंवा अत्यंत गंभीररीत्या जखमी झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. याआधी इराकच्या मीडिया सेलने विमानतळाच्या मालाच्या गोदामाजवळ झालेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात अनेक लोक मारले गेल्याच्या आणि दोन चारचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या बातम्या दिल्या होत्या.