वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कोविड-19 आपत्कालीन मदत कर्ज योजनेतून फसवणुकीच्या माध्यमातून 18 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 कोटी 36 लाख रुपये लाटणाऱ्या भारतवंशीयाला अमेरिकेत दोन वर्ष कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुकुंद मोहन असे या भारतवंशीयाचे नाव असून अमेरिकेच्या न्याय विभागाने त्याला ही शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय त्याला एक लाख डॉलर्सचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.
फसवणुकीतून मिळविले होते कर्ज
वॉशिंग्टनमधील क्लायडे हिलमध्ये राहणाऱ्या मुकुंद मोहन याने कोविड-19 रिलिफ फंड योजनेतून फसवणुकीच्या माध्यमातून 18 लाख डॉलर्सचे कर्ज मिळविले होते. या प्रकरणी 15 मार्च रोजी तो दोषी आढळला होता. यानंतर न्यायालयाने त्याला दोन वर्षे कैद आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय कर्जाच्या रकमेची भरपाईही त्याला करावी लागणार आहे. वॉशिंग्टनच्या पश्चिम जिल्ह्यातील न्यायालयाने मोहनला या प्रकरणी दोषसिद्धीनंतर दोन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. जुलै 2020 मध्ये त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
55 लाख डॉलर्सच्या कर्जासाठी केले होते अर्ज
मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन अशा नामांकित कंपन्यांसाठी काम केलेल्या मोहन याने रोजगारासंबंधीची बनावट कागदपत्रे सादर करून अमेरिकन सरकारच्या पेचेक संरक्षण उपक्रमातून फसवणुकीच्या माध्यमातून कर्ज मिळविले होते. त्याने 55 लाख डॉलर्सच्या कर्जासाठी अर्ज दिला होता आणि बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने 18 लाख डॉलर्सचे कर्ज मिळविले होते. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, मोहनने कर्जासाठी आठ बनावट अर्ज सादर केले होते. या माध्यमातून त्याने 55 लाख डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. यासाठी त्याने बनावट कागदपत्रे सादर केली होती.
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मिळविले कर्ज
मोहनची कंपनी माहेन्जोने 2019 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना लक्षावधी डॉलर्सचा पगार दिल्याचे तसेच कर भरल्याचे त्याने या कागदपत्रांतून दाखविले होते. ही कंपनी 2020 च्या आधीपासून सुरू असल्याचे त्याने या बनावट कागदपत्रांतून दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात त्याने मे 2020 मध्ये माहेन्जो कंपनी खरेदी केली होती. यावेळी या कंपनीत कुणीही कर्मचारी नव्हता, तसेच कंपनीकडून कोणताही व्यवसाय केला जात नव्हता. या माध्यमातून मोहनने केलेल्या आठ अर्जांपैकी पाच अर्ज मंजूर झाले आणि त्याने फसवणुकीच्या माध्यमातून तब्बल 18 लाख डॉलर्सचे कर्ज कोविड-19 रिलिफ फंडातून लाटले होते.
हेही वाचा - अफगाणिस्तानला असे वाऱ्यावर सोडू शकत नाही; चीनने अमेरिकेवर फोडले खापर