वॉशिंग्टन डी सी - अमेरिकेत 45व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज तेथील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्यांची निवड झाली आहे. लिबरटेरियन पार्टीचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा त्यांनी पराभव केला. त्यांनी 71 टक्के मते मिळवली आहेत.
कोण आहेत राजा कृष्णमूर्ती ?
राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म 19 जुलै 1973 ला नवी दिल्लीमध्ये एका तामिळ कुटुंबामध्ये झाला होता. ते तीन महिन्यांचे असतानाच, त्यांचे आई-वडील अमेरिकेला स्थायिक झाले होते. 2016 ला ते पहिल्यांदा हाऊस निवडून आले होते. तसेच 2000 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी बराक ओबामा यांचा प्रचार केला होता. कृष्णमूर्ती हे पेशाने वकील आणि अभियंता आहेत.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय?
अमेरिकन काँग्रेस हे अमेरिका या देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन गृहे असून वरिष्ठ गृहाला सेनेट तर कनिष्ठ गृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असे म्हणतात. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी प्रत्यक्ष जनता सदस्य निवडून देत असते.
पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार ?
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. दुपारी 12.44 पर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) जो बायडेन आघाडीवर आहेत. त्यांना 220 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. या दोघांनाही विजयासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.