न्यूयॉर्क - भारतीय अमेरिकी पत्रकार ब्रह्म कंचिभोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नऊ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी सकाळी ब्रह्म कंचिभोटला यांचे निधन झाल्याचे त्यांचा मुलगा सुदामा कंचिभोटला यांनी सांगितले.
ब्रह्म कंचिभोटला यांचे वय 66 वर्षे होते. त्यांनी युनायटेड न्यूज ऑफ इंडियासाठी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी अमेरिकेत 28 वर्ष पत्रकारिता केली. मर्जर मार्केटस या आर्थिक प्रकाशनासाठी त्यांनी संहिता संपादक म्हणून काम केले. कंचिभोटला न्यूज इंडिया-टाईम विकली वर्तमानपत्राशी संबंधित होते. 1992 साली कंचिभोटला अमेरिकेत स्थलांतरित झाले.
कोरोनामुळे न्यूयार्कमध्ये बंधने असल्यामुळे ब्रह्म कंचिभोटला यांचे अंत्यसंस्कार कसे होतील याबाबत सांगता येत नाही, असे सुदामा कंचिभोटला यांनी सांगितले. अंत्यसंस्कारावेळी फक्त 10 लोक उपस्थित राहू शकतील, अशा सूचना असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रह्म कंचिभोटला यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे 23 मार्चला समोर आले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर 28 मार्चला लॉंग आयलँड येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 31 मार्च रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. ब्रह्म कंचिभोटला यांच्या पश्चात मुलगा सुदामा, पत्नी अंजना आणि मुलगी सिऊजाना असा परिवार आहे.
न्यूयॉर्क शहरात सोमवारी रात्रीपर्यंत 4758 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत 398196 जण कोरोनाबाधित तर 10986 जणांचा मृत्यू झाला.