वॉशिंग्टन डी.सी - कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 3 लाख 64 हजार 852 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 74 लाख 75 हजार 839 वर पोहचली आहे. तर, 4 हजार 882 नव्या मृत्यूची नोंद झाल्यान एकूण मृतांची संख्या 10 लाख 77 हजार 594 वर गेली आहे.
अमेरिकेला कोरोनाचा सर्वांत जास्त फटाका बसला आहे. 79 लाख 45 हजार 505 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 2 लाख 19 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, भारत दुसऱ्या स्थानांवर आहे. भारतात कोरोना रुग्णांनी 70 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
अमेरिका, इंग्लंड, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प, इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो, रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन, रशियाचे बांधकाममंत्री व्लादिमिर याकुशेव आणि ब्रेक्झिटमधील प्रमुख तडजोड करणारे मिशेल बार्निअर यांचा समावेश आहे.