वाशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गेल्या 24 तासामध्ये जगात तब्बल 3 हजार 580 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 38 हजार 802 बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत.
जगभरामध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 3 कोटी 12 लाख 30 हजार 103 वर पोहचली आहे. तर 9 लाख 65 हजार 41 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 2 कोटी 28 लाख 21 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये अमेरिकेत कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार झाला असून 70 लाख 4 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 लाख 4 हजार 118 जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोना रुग्णांनी 54 लाखांचा आकडा पार केला आहे. मात्र, अमेरिकेपेक्षा भारताचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जास्त आहे.
देशात एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असून भारताने अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. जगात भारताचा रिकव्हरी रेट 19% , अमेरिकेचा 18.70 टक्के आणि ब्राझीलचा 16.90 टक्के आहे.