वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 28 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 लाख 20 हजार 268 वर पोहोचली आहे. तर 2 लाख 28 हजार 224 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 10 लाख 355 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वांत जास्त दगावले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत आत्तापर्यंत 10 लाख 64 हजार 572 कोरोनाबाधित असून 59 हजार 266 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 2 लाख 36 हजार 899 कोरोनाबाधीत तर 24 हजार 275 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यापाठोपाठ इटलीमध्ये 2 लाख 3 हजार 591 जण कोरोनाबाधित आहेत. तर 27 हजार 682 जणांचा बळी गेला आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत. सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधातील लस बनविण्यात यश येईल, असा दावा ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणूवरील लस बनविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. मात्र, त्याआधीच लस शोधून काढण्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. ब्राझील, कुवैत, अफगाणिस्तान, मालदिव, अमेरिका या देशांना भारताने मदत केली आहे.