वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 19 लाख 99 हजार 19 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना विषाणूमुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.
कोरोनाबाधितची संख्या 19 लाख 99 हजार 19 तर मृतांचा आकडा 1 लाख 26 हजार 708 वर पोहaचला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 4 लाख 78 हजार 932 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यामध्ये कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 228 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 25 हजार 575 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 6 लाख 2 हजार 989 वर पोहचली आहे.
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून गेल्या 24 तासांमध्ये 46 नवीन कोरोनाप्रकरणे आढळली आहेत. तर जपानमध्ये 457 नवीन रुग्ण आढळले असून एकूण आकडा 8 हजार 100 वर पोहोचला आहे.
जगभरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.