मुंबई - ब्रिटन पाठोपाठ आता अमेरिकेत देखील कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी अमेरिकेत प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिली. यासोबत त्यांनी जगाचे अभिनंदन देखील केले. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनूसार, अमेरिकेमध्ये लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली. ही लस फायझर या कंपनीची आहे. फायझर लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. फायझर या कंपनीने या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.
दरम्यान, भारतातही फायझर- बायोएनटेक या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे.
ब्रिटनमध्ये जगातील पहिली लसीकरणाची मोहिम
कोरोना प्रतिबंधासाठी जगातील पहिली लसीकरणाची मोहिम ब्रिटनमध्ये सुरु झाली. मार्गारेट किनन या नव्वद वर्षांच्या आजी लस टोचवून घेणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या. ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला मंजुरी दिली आहे.
हेही वाचा -वॉशिंग्टनमधील गांधींच्या पुतळ्याची विटंबना; शेतकरी आंदोलनाआडून खलिस्तानी चळवळीचे कृत्य
हेही वाचा - 'आगामी चार ते सहा महिने अत्यंत वाईट, कोरोना नियमांचे पालन करा'; बिल गेट्स यांचा इशारा