सैन फ्रान्सिस्को - कॅलिफोर्नियाच्या चारही बाजूंच्या जंगलांमध्ये तब्बल 21 भयंकर आगी लागल्या आहेत. या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी 13 हजार 800 हून अधिक अग्निशामक दलांचे कर्मचारी अक्षरशः झुंजत आहेत. येथील अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. आतापर्यंत मेंडोकिनो, हम्बोल्ट, ट्रिनिटी, तेहमा, ग्लेन, लेक आणि कोलुसा हे प्रदेश या आगींच्या तडाख्यात सापडले आहेत.
कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निसुरक्षा विभाग (कॅल फायर) यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मेंडोकिनो नॅशनल फॉरेस्टमध्ये 37 वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या गंभीर स्वरूपाच्या आगी आटोक्यात आणणे अत्यंत कठीण बनले आहे. आता या आगी तब्बल 10 लाख 24 हजार 92 एकरांवर पसरल्या आहेत. यापैकी 67 टक्के आगी फक्त शनिवारी सकाळी पसरल्या आहेत.
हेही वाचा - 'पाकिस्तानमध्ये 828 हिंदू मंदिरापैकी शिल्लक राहिलीत केवळ 20 मंदिरे'
ऑगस्टमध्ये जोरदार विजा चमकण्यामुळे जंगलांना आग लागण्याच्या घटना सुरू झाल्या. 18 ते 20 ऑगस्टदरम्यान जोरदार गडगडाटासह झालेल्या रिमझिम पावसानंतर याला सुरुवात झाली होती. 37 वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींपैकी काही आगी आपल्या आपणच विझल्या होत्या. मात्र, काही ठिकाणच्या आगींनी रौद्र रूप धारण केले आणि सध्या 21 ठिकाणी या मोठ्या आगी लागल्या आहेत.
वातावरणीय बदलांमुळे विविध नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यातील बहुतेक आपत्ती मानवाच्या निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे निर्माण होत आहेत. जागतिक तापमानवाढ ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियातील जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे, जंगले, वनसंपत्ती आणि प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. याची सोशल मीडियावर प्रसारित झालेली छायाचित्रे विदारक होती आणि त्यातून या आगींची भीषणता स्पष्ट दिसत होती.
हेही वाचा - थायलंडमध्ये बस-ट्रेनच्या धडकेत 17 ठार