जिनिव्हा - कोरोनाने संपूर्ण जग मेटाकुटीला आले असताना ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे थैमान सुरू आहे. दरम्यान कोरोनाला अटकाव करण्यासाठी काही युरोपीय देशांमध्ये लसीकरणास सुरूवात झाली आहे. लसीकरणानंतर कोरोनाचा नायनाट शक्य आहे, असा सुटकेचा नि:श्वास घेतला जात असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांनी कोरोना ही जगातील शेवटची महामारी नसून यानंतरही अशी महामारी येईल, असा इशारा दिला आहे.
..त्याशिवाय मानवी आरोग्य सुधारणार नाही
कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा आजार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. क्लायमेंट चेंज रोखणे आणि पशू कल्याण केल्याशिवाय मानवी आरोग्य सेवा सुधारणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मात्र, कोणताही देश पुढील महासाथीचा आजार रोखण्यास समर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील महामारीचा विचार आवश्यक -
टेड्रोस यांनी म्हटले की, कोरोना महासाथीच्या आजारापासून शिकण्याची ही वेळ आहे. दीर्घकाळापासून जग भयाने ग्रासले आहे. महासाथीच्या आजारात मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च झाले आहेत. आजार संपल्यानंतर आपण त्या संकटाला विसरतो आणि पुढील महासाथीचा आजार रोखण्यासाठी काहीच करत नाही. अशा पद्धतीने विचार करणे यापुढे धोकादायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या वर्षात कोरोनाबाधितांची संख्या वाढणार -
एका अभ्यासानुसार, करोनाचा नवा स्ट्रेन हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुढील वर्षी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती असून रुग्णालयांत जागा कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. करोनाबाधितांच्या मृतांची संख्या वाढण्याचाही धोका व्यक्त केला जात आहे.