ओत्तावा : इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आता कॅनडामध्येही पोहोचला आहे. याठिकाणी या विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती देशाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या दोघांनाही आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही..
देशाच्या दुरहम भागामध्ये हे रुग्ण आढळले आहेत. हे दोघे दाम्पत्य आहेत. विशेष म्हणजे या दोघांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, किंवा आपण कोणा कोरोना रुग्णाच्या संपर्कातही आलो नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीबीसी न्यूज या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.
खबरदारी बाळगण्याचे आवाहन..
शनिवारी कॅनडाच्या ओंटारियो भागातील सहयोगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बार्बरा याफ्फे यांनी या रुग्णांबाबत माहिती दिली. यानंतर ओंटारियो भागातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यानंतर दुरहमच्या स्थानिक वैद्यकीय विभागामार्फत या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी ते केंद्रीय आरोग्य विभागाचीही मदत घेणार आहेत.
नवा विषाणू अधिक संसर्गजन्य..
ब्रिटनमध्ये आढळलेले कोरोनाचे हे नवे विकसीत रुप अधिक संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. सध्या हा विषाणू ब्रिटनसोबत डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समध्ये पोहोचला आहे.
हेही वाचा : कोरोना ३.०? ब्रिटनमध्ये आढळले कोरोनाचे आणखी एक विकसीत रुप; जुन्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य