न्यूयॉर्क - अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रथमच घरच्या घरी कोरोना विषाणूची चाचणी करणाऱ्या किटला मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकन लोकांना वैद्यकीय सुविधा आणि तत्काळ देखभाल केंद्रांशिवायही इतर ठिकाणी चाचणी घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
एफडीएने मंगळवारी कॅलिफोर्नियातील लुसिएरा हेल्थच्या 30 मिनिटांत चाचणी करणाऱ्या किटला मान्यता दिली. या चाचणीमध्ये एका कुपीमध्ये स्वतःच जमा केलेल्या नाकातील स्वॅबचा नमुना हलवून चाचणी युनिटमध्ये ठेवणे आवश्यक आहे. यानंतर 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात चाचणी युनिटच्या लाइट-अप प्रदर्शनात अहवाल वाचता येतो. एखादी व्यक्ती सार्स-कोव्ह -2 विषाणू पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे यावरून समजते.
हेही वाचा - इंग्लंडच्या पंतप्रधानांकडून दिवाळीच्या शुभेच्छा; हिंदुसह शीख धर्मीयांबद्दल व्यक्त केला आदर
सध्या केवळ प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या चाचण्यांसाठीच या किटच्या वापरास परवानगी आहे. सध्या अमेरिकेत आरोग्य व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर कोविड चाचण्या घेतल्या जातात. याचे अहवाल प्रयोगशाळांमध्ये तयार केले जातात.
मंगळवारी व्हाईट हाऊसच्या लीक झालेल्या अंतर्गत अहवालानुसार, अमेरिकेतील सर्व 50 राज्यांत कोरोना विषाणू सामुदायिक पातळीवर (community spread) वेगाने पसरत आहे.
जगातील सर्वाधिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. तसेच, येथील मृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
हेही वाचा - वर्षाअखेर उपलब्ध होणार बायोएनटेक आणि फायझर कंपनीची कोरोना लस