जिनिव्हा : पृथ्वीचे वातावरण अतिशय वेगाने तापत असून येत्या तज्ञांनी इशारा दिलेल्या तापमानवाढीचा उच्चांक येत्या दशकभरातच गाठला जाऊ शकतो असे गंभीर संकेत संयुक्त राष्ट्राच्या सोमवारी प्रकाशित झालेल्या अहवालातून देण्यात आले आहेत. मानवतेसाठी हा धोक्याचा "कोड रेड" असल्याचे या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. मानव समुदायाने आजघडीला कार्बन ऊत्सर्जन लक्षणीयरित्या कमी केले तरीही काही दुष्परिणाम हे टाळणे अशक्यच असल्याचा गंभीर इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. आपण अगोदरच इतके ऊत्सर्जन करून ठेवले आहे की, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागणार असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.
आपण कुठेही लपू शकत नाही
दिवसेंदिवस हवामान बदल आणि तापमान वाढीची स्थिती ही वाईटाहून वाईटच होत चालली आहे. आपण कुठेही लपू शकत नाही, कुठेही पळून जाऊ शकत नाही असे या अहवालाच्या को-ऑथर तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय वातावरण संशोधन केंद्रातील वरिष्ठ हवामान संशोधक लिंडा मर्न्स यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने सोमवारी हा अहवाल प्रकाशित केला.
2030 पर्यंतच तापमान 1.5 अंशांनी वाढणार
2100 पर्यंत वातावरणातील तापमानात दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज 2013 मध्येच तज्ञांनी वर्तविला होता. यानंतर ही तापमानवाढ 1.5 अंशांपर्यंतच रोखण्यावर जागतिक नेत्यांचे एकमत झाले होते. मात्र आताच हे तापमान 1.1 अंशांनी वाढले असून 1.5 अंशांची पातळी आपण 2030 पर्यंतच गाठू असे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे येत्या काही दशकात या तापमानवाढीच्या परिणामांचा सामना करण्यासाठी आपण तयार राहण्याची गरज असल्याचे या अहवालातून दिसून येते असे अहवालाचे को-चेअर वॅलेरी मॅस्सन-डेल्मोट्टे म्हणाले.
काही दुष्परिणाम भोगावेच लागणार
या तीन हजार पानी अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन्ही ध्रुवांवरील हिमनग अतिशय वेगाने वितळत असून सागरी पाणीपातळीही त्याच वेगाने वाढत आहे. याच्या परिणामी ऋतुचक्रातही अतीतीव्र टोकाचे बदल बघायला मिळत आहे. विनाशकारी चक्रीवादळे, महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी, अतीतीव्र उष्णता आणि अतीतीव्र थंडीच्या लाटा हे याचेच परिणाम आहेत. आज आपण ऊत्सर्जनात लक्षणीय घट केली तरी काही दुष्परिणाम हे टाळता येणे अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आपण आधीच वातावरणात मोठ्या प्रमाणात हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन करून ठेवले आहे असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.
मानवी कृतींमुळेच ग्लोबल वॉर्मिंग
औद्योगिकीकरणानंतरच्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने उष्णता शोषून घेणारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मानवी कृतीद्वारे कोळसा, इंधन, तेल, लाकूड आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून हे निर्माण झाले आहे. यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाचा अगदीच थोडा वाटा असल्याचे यात म्हटले आहे.
पॅरिस करारानंतरही तापमान वाढ सुरूच
या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजेच 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग 2 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी 2015 मध्ये पॅरिस करारावर स्वाक्षरी करून कार्बन ऊत्सर्जन कमी करण्याचे ठरविले होते. मात्र संशोधकांच्या अभ्यासानुसार येत्या 2030 पर्यंतच जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हे धोक्याचेच संकेत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - सावधान! ...तर तीन अंशांनी वाढणार जागतिक तापमान! संशोधकांनी दिला इशारा