कानो - नायजेरियामध्ये काही बंदूकधाऱ्यांनी तब्बल ८ गावांमध्ये गोळीबार केला. यात तब्बल ४० जण ठार झाले. तसेच, अनेक जखमी झाले. देशातील आपात्कालीन सेवांकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. हे अज्ञात बंदूकधारी दुचाकींवरून आले आणि त्यांनी निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
आपात्कालीन सेवांचे प्रवक्ते इब्राहीम आदु हुसैन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना याविषयी माहिती दिली. 'आतापर्यंत ४० मृतदेह मिळाले आहेत. बचावकार्य करणाऱ्या पथकांना अजूनही मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत कित्येक लोक जखमी झाले आहे. तर, सुमारे २ हजार ग्रामस्थांना घरे सोडून जाणे भाग पडले आहे,' असे ते म्हणाले.