जोहान्सबर्ग - कोरोनाने ( Coronavirus ) संपूर्ण जगाला महासंकटात टाकलं आहे. आता कोरोनाचा प्रसार थोडा आटोक्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण अफ्रिकेत ( South Africa )कोरोनाचा एक नवा प्रकार समोर आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही चिंतेची बाब आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रतातील तरुणांमध्ये याचा प्रसार वेगाने होत असल्याचे आढळलं आहे. ही माहिती आरोग्य मंत्री जो फाहला यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू जसजसा पसरतो, तसतसा तो विकसित होतो आणि अनेक नवीन रूपं घेतो. बदलत्या प्रकारावर शास्त्रज्ञ नजर ठेवतात. या नव्या कोरोनचा सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होईल की नाही हे शोधण्यासाठी वेळ लागू शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
जीनोमिक सिक्वेन्सिंगवरून दिसून आले आहे, की आतापर्यंत B 1.1.529 प्रकाराची 22 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेत कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकार आढळून आले होते. त्याचे वैज्ञानिक नाव B.1.617.1.AY104 असे ठेवण्यात आले होते या बेट देशात उद्भवलेल्या कोरोना विषाणूचे तिसरे उत्परिवर्तन होते. खरं तर, आतापर्यंत कोरोनाचा डेल्टा प्रकार अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने धुमाकूळ घातला होता.
60 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये 2.9 दशलक्षाहून अधिक कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यात 89,000 हून अधिक मृत्यूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील सुमारे 41 टक्के प्रौढांचे लसीकरण करण्यात आले आहे आणि दररोज दिल्या जाणाऱ्या शॉट्सची संख्या तुलनेने कमी आहे. सरकाराने लसीकरणाचे 3,00,000 प्रतिदिन लक्ष्य दिले आहे. मात्र, प्रतिदिन लसीकरण होणाऱ्याची संख्या 1,30,000 पेक्षा कमी आहे.