मोगादिशू - सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटबाहेर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्ब स्फोटात 10 जण ठार आणि 30 जण जखमी झाले. वृत्तसंस्था सिन्हुआने ही माहिती दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने सांगितले आहे की, हल्ल्यात जखमी झालेले बहुतेक लोक सामान्य नागरिक होते. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यात बंदराजवळील लूल येमेनी रेस्टॉरंटला लक्ष्य करण्यात आले.
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोट झाल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मृतांची संख्या वाढू शकते. रेस्टॉरंटजवळ त्यांनी जोरात स्फोटाचा आवाज ऐकला. या रेस्टॉरंटला यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये एका दहशतवादी गटाने लक्ष्य केले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तेथे मोठा स्फोट झाला आणि स्फोटात बरेच लोक ठार झाले हे आम्हाला कळले. मोठ्या संख्येने सशस्त्र दले घटनास्थळी पोहोचली आहे असून त्यांनी परिसराला घेराव घातला आहे.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सुरक्षा दले आणि अतिरेकी यांच्यात जोरदार गोळाबार झाला. यादरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघताना दिसू शकतो. ते म्हणाले की, स्फोट इतका जोरदार होता की, घटनास्थळाजवळील एक घर कोसळले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यावर्षी सोमालियाच्या राजधानीत झालेला हा दुसरा आत्मघातकी स्फोट आहे.
31 जानेवारीला आफ्रिक हॉटेलच्या बाहेर झालेल्या आत्मघाती कार स्फोटात पाच लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. अल शहाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.