मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका पोलीस चौकीत झालेल्या स्फोटात सहा जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एका आत्मघातकी हल्लेखोराने पोलीस चौकीत जाऊन हा बॉम्ब फोडल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या माहिती विभागाने याबाबतची पुष्टी केली आहे.
सोमालियाच्या पंतप्रधानांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सद्भावना व्यक्त केल्या आहेत. माहिती विभागाने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
सोमालिया नॅशनल टेलिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, मोगादिशूच्या वाबेरी पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी हा हल्ला झाला. एक सुसाईड बॉम्बर विस्फोटकांनी भरलेली एक गाडी घेऊन थेट पोलीस ठाण्याच्या आवारात शिरला. यानंतर त्याने स्फोट केला. यामध्ये वाबेरी पोलीस ठाण्याचे प्रमुख अहमद बशाने आणि वालियोव अॅडे पोलीस विभागाचे डेप्युटी कमांडर अब्दी बसीद हे दोघे या हल्ल्यात ठार झाले. तसेच या हल्ल्यात कित्येक जखमी झाल्याचीही माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान मोहम्मद हुसैन रोबल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला.
हेही वाचा : संकट टळले! चीनचे रॉकेट अखेर हिंद महारागरात कोसळले