मुंबई - शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 383 रुग्ण आढळून आले असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 740 वर तर मृतांचा आकडा 2 हजार 111 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 25 हजार 947 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 682 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1 हजार 383 रुग्ण आढळून आले आहेत. तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 47 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 47 पुरुष आणि 22 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 37 जणांचे वय 60 वर्षांवर तर 25 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 795 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 25 हजार 947 वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 56 हजार 740 वर पोहचला आहे. त्यापैकी 2 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 25 हजार 947 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 28 हजार 682 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण दुपटीचा सरासरी दर 26 दिवस -
मुंबईत कोव्हिड 19 म्हणजेच कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलींग रेट) कालावधी वाढून 26 झाला आहे. 6 ते 12 जून यादरम्यान आठवड्याभरात आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येवर पालिकेने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, मरिन लाईन्स सी विभाग, अंधेरी पूर्व के ईस्ट विभाग, मालाड पो नॉर्थ, बोरोवली आर सेंट्रल, दहिसर आर नॉर्थ, कांदिवली आर सेंट्रल, भांडुप एस वॉर्ड, मुलुंड टी वॉर्ड या 9 विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 20 दिवसाहून कमी आहे. तर, एम पूर्व विभागात 52 दिवस, एफ उत्तर या विभागात 51 दिवस, जी उत्तर आणि एच पूर्व मध्ये 48 दिवस तर ई विभागात हा कालावधी 43 दिवस इतका आहे. या 5 विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसाहून अधिक आहे.