मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत रोज हजार ते दीड हजार रुग्णांची रोज भर पडत आहे. मुंबईत आणखी 903 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 77 हजार 197 वर पोहचली आहे. तर 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 हजार 554 वर गेला आहे. आतापार्यंत 44 हजार 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 473 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनामुळे 93 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 36 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 57 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 93 मृत्यूपैकी 67 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 57 पुरुष आणि 36 महिला रुग्ण होत्या. मृतांमधील 11 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. तर 44 जणांचे वय 60 वर्षावर होते. तसेच 38 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. दरम्यान आज 625 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 44 हजार 170 वर पोहचला आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर -
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला आहे. 23 ते 29 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.69 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवस इतका आहे. ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अशा 750 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग कन्टेंमेन्ट झोन म्हणून सील करण्यात आले आहे. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5 हजार 875 इमारतीमधील माळे, विंग तर काही इमारतीच पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 7 हजार 576 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये 14 हजार 175 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत अति जोखमीच्या संशयितांना 1 लाख 12 हजार 874 क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 28 हजार 621 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.