पुणे - पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे. अॅमेझॉनमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्याचे अॅमेझॉनच्या ऑफिसची तोडफोड केली आहे.
मनसे आक्रमक -
अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा अशी मनसेची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सुरुवातीला या मागणीची अॅमेझॉनकडूनही काही प्रमाणात दखल घेण्यात आली होती. मात्र, नंतर कंपनीने मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. याबाबत कंपनीला मनसेने वारंवार आठवण करूनसुद्धा अॅमेझॉनने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. तसेच अॅमेझॉनकडून राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचे उत्तर म्हणून थेट पुण्यातल्या कार्यालयातच खळखट्याक केले आहे. यावेळी घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
हेही वाचा - रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील सुभद्रा बँकेचा परवाना रद्द
दिंडोशी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना नोटीस
मुंबईतल्या दिंडोशी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये ५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. या नोटिशीनंतर मनसे अधिक आक्रमक झाली असून, त्याची किंमत ॲमेझॉनला मोजावी लागेल असे मनसेकडून कालच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे.
मनसे अॅमेझॉनच्या विरोधात खळ्ळ खट्याक-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या विषयावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठीचा समावेश असावा, ही मागणी करत मनसे अॅमेझॉन विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनने मराठीला स्थान द्यावे, अशी मुख्य मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मात्र, अॅमेझॉन व्यवस्थापनने या मागणीला मान्य करण्यास तयार नसल्याने मनसेचे कार्यकर्ते अमेझॉन विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी पोस्टरबाजीसह आता अॅमेझॉनच्या जाहिरात दर्शवणारे पोस्टर फाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेने आता अॅमेझॉनविरोधात खळ्ळ खट्याकची भूमिका स्वीकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.