सांगली - क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अजरामर नाव. जुलमी ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिटीश राजवट झुगारून नीरा काठ पासून कृष्णा, वारणा नद्यांचा खोऱ्यात प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार स्थापन केली. भारताचा स्वातंत्र्य महोत्सवी वर्षात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतीथी निमित्ताने त्यांच्या जाज्वल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देणारा ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट, त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ.
ब्रिटिश सरकारला आव्हान देणारे प्रति सरकार- ब्रिटिशांच्या गुलामी विरोधात देशात बंडाचे वणवा पेटला होता. अशा परिस्थितीत ब्रिटिश सरकारला थेट आव्हान देण्याचे काम क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले. ते म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रतिसरकारची स्थापना करून. 9 ऑगस्ट 1942 मध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रति सरकारची मुहूर्तमेढ रोवली. ज्याला "पत्री सरकार" म्हणूनही ओळखले जाऊ लागले. भूमीगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारसमोर प्रति सरकारने मोठे आव्हान उभे केले होते.
नोकरीचा राजीनामा देत स्वातंत्र्य लढ्यात उडी- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रगड हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव. 3 ऑगस्ट 1900 रोजी नाना पाटील यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येडे मच्छिंद्रगड हे गाव दक्षिण सातारा जिल्ह्यात होते. बालपणापासूनच नाना पाटील भारदस्त शरीरयष्टीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. शिक्षण झाल्यानंतर नाना पाटील हे ब्रिटिश सरकारच्या काळात तलाठी म्हणून नोकरीत रुजू झाले होते. मथुरा नाना पाटील यांना समाजकारणाची राजकारणाची मुळात आवड होती. त्यामुळे 1930 मध्ये देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाल्यानंतर नाना पाटील यांनी आपल्या तलाठी पदाचा राजीनामा देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यानंतर 1942 पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील यांना आठ ते नऊ वेळा तुरूंगात जावे लागले.
भाषणातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा- वारकरी संप्रदायाचा पगडा असणाऱ्या नाना पाटील यांच्याकडे वक्तृत्वशैली असल्याने ग्रामीण भागात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी जागृती सुरू केली. आपल्या भाषणातून गाव गाड्यातल्या प्रत्येकाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास त्यांनी प्रेरित केले. त्यामुळे जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढवय्ये नेतृत्व म्हणून नाना पाटील यांचे नाव वाढत गेले. 1940 च्या दरम्यान संपूर्ण देशभरात क्रांतीची लाट उसळली होती. इंग्रज सरकार "चले जाव" चळवळ सुरू झाल्यावर देशातील अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. याच दरम्यान सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात बंड पुकारला. ब्रिटिश सरकारला समांतर शासन यंत्रणा उभारण्याचा निर्णय करत "आपल्या देशाचा आणि आपला कारभार आपणच करू " या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 1942 च्या दरम्यान नाना पाटील यांनी "प्रति सरकार"ची स्थापना केली. जवळपास नीरा नदी काठापासून ते कृष्णा वारणा या नद्यांच्या खोऱ्यात 1500 गावात प्रतिसरकारचा कारभार सुरू होता.
तुफान सेनेने ब्रिटिशांना केले होते नामोरहम- गावागावात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तरुणांचे संघटन उभे केले होते. प्रतिसरकारच्या माध्यमातून नाना पाटील दरोडेखोर, सावकारी करणारे जमीनदार, जुलमी ब्रिटिश आणि गावगुंडांच्या विरोधात लढण्यासाठी "तुफान सेना" हे सैन्य दल स्थापन केले. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त केला जात. या शिवाय ब्रिटिश सरकारच्या रेल्वे, पोस्ट सेवांवर हल्ले करून नामोहरम करण्याबरोबर ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याचे काम तुफान सेनेच्या माध्यमातून केले जात.
पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, पण शेवटपर्यंत लागला नाही पत्ता- क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था निर्माण केली होती. अन्नधान्य पुरवठा असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत या प्रतिसरकारच्या माध्यमातून होत असे. त्यामुळे नाना पाटील यांना गावागावातून दीनदुबळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या भूमिगत चळवळीला गावागावातून रसद मिळत असे, इतकेच नव्हे तर नाना पाटील यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक बक्षीसही जाहीर केली. पण कोणत्याही प्रकारची माहिती ब्रिटिश सरकारने नाना पाटलांची मिळू शकली नाही.
घर आणि जमीन केले जप्त- 1942 ते 1946 पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील ते भूमिगत राहिले होते. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने जंगजंग पछाडले. पण त्यांना अखेरपर्यंत पकडू शकले नाहीत. इतकेच नव्हे तर त्याला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरावर जप्ती आणली. इतकेच नव्हे तर त्यांच्या जमिनीही जप्त केल्या. नाना पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर त्यांना जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कारा मध्ये व्हावे लागले होते. 1946 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळणार ही खात्री झाल्यानंतरच 6 वर्षे भूमिगत असलेले क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा या ठिकाणी प्रकट झाले होते.
स्वातंत्र्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य- प्रति सरकारला 'पत्री सरकार' म्हणून ही ओळखत, या प्रतिसरकारच्या 'तुफान सेने'कडून जुलुम करणार्यांच्या पायात पत्रे ठोकत, अशी अफवा गावागावात होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग घेतला होता शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या माध्यमातून नाना पाटील यांचं कार्य स्वातंत्र्य उत्तर काळात राहिले. 1957 मध्ये झालेल्या उत्तर सातारा मतदारसंघातुन लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1967 मध्ये ते बीड या ठिकाणाहून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून हे खासदार मधून निवडून आले होते. तर संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार ठरले.
वाळव्यात घेतला अखेरचा श्वास- स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते. अशा या क्रांती सिंहाचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 रोजी वाळवा याठिकाणी झाला. मृत्यूनंतर त्यांचा दहन वाळवा या ठिकाणी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार वाळवा गावात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा दहन झालं.आज याठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक प्रेरणादायी म्हणून उभे आहे.