मुंबई : प्रदर्शनापूर्वीच 'गुल्हर'मधील 'लहर आली, लहर आली गं...' या गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. आता हे संपूर्ण गाणं व्हिडीओसह रिलीज करण्यात आलं आहे. सुमधूर संगीत आणि आवाजाच्या जोडीला 'लहर'मधली नवी कोरी जोडीही प्रेक्षकांना भावत आहे. 'लागीरं झालं जी' (Lagira Zala Ji Fame Shivani Bavkar) मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे. या दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं 'लहर आली, लहर आली गं...' हे गाणं 'गुल्हर'मधील दोघांच्या प्रेमकथेत गुलाबी रंग भरण्याचं काम करणारं आहे.
पोस्टरवरील पावसात भिजणारी शिवानी-रमेश जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची कथा जरी एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली तरी त्यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. 'गुल्हर'च्या दिग्दर्शनासोबतच रमेश चौधरी यांनी यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी आणि पद्मनाभ गायकवाड यांनी लिहिलं असून, पद्मनाभनंच अजय गोगावले आणि अपूर्वा निशादच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
राष्ट्रीय आंतराष्ट्रीय महोत्सवात छाप
आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी 'गुल्हर'ची निर्मिती केली आहे. 'गुल्हर'वर देश-विदेशातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या बऱ्याच पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखनासोबतच तांत्रिक विभागातील कामाचंही कौतुक झालं आहे. मोहन पडवळ यांनी 'गुल्हर'ची कथा लिहिली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे.
हेही वाचा - Arman Kohli Bail Rejected : अभिनेता अरमान कोहलीला दिलासा नाही.. जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला