मुंबई - 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुंबईतील प्रसिद्ध अशा धोबीघाटवर देखील एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. धोबीघाटात मुंबईकरांसाठी तसा नवा विषय नाही. मात्र, मागच्या दीडशे वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांना सेवा देणारा, मुंबईच्या जडणघडणीत मोठं योगदान असणारा हा भाग आता काहीसा मागे पडत चालला आहे. याच विषयाला धरून दिग्दर्शक के. एस. श्रीधर यांनी एक डॉक्युमेंट्री बनवली. ज्याचे आज आंतरराष्ट्रीय प्रकारात स्क्रिनिंग करण्यात आले.
धोबीघाट एक वेगळं जग - "धोबीघाट ही मुंबईतील एक अशी जागा आहे इथून आपण रोज ये-जा करतो मात्र आपल्याला कळत देखील नाही की इथं धोबीघाट आहे. त्याच्या आत नेमकं काय जग आहे हे आपल्या लोकांना माहीत नाही. या लोकांचं स्वतःच एक कल्चर आहे. यांच्या परंपरा आहेत आणि या डॉक्युमेंटरीमध्ये मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय." असं श्रीधर म्हणाले.
आपल्यापेक्षा धोबीघाटची लोकं कितीतरी चांगली - अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला धोबीघाट पाहायला मिळतो. मात्र, तो एखादा शूटआउट किंवा एखादा गुंड आणि त्याच्या मागे पोलीस धावताना अशा स्वरूपातला. यावर धोबीघाटचे दिग्दर्शक श्रीधर म्हणाले की, "एखाद्या चित्रपटाचा गरजेनुसार तसं चित्र दाखवलं जातं पण खरा धोबीघाट हा त्याहून वेगळा आहे. ही लोक आपल्याहून कितीतरी चांगली आहेत. आपल्याला माहिती नसतं की आपल्या बाजूला कोण राहतोय पण ही सर्व लोकं एक परिवार म्हणून राहतात आणि मागची कित्येक वर्ष एका कुटुंबाप्रमाणे राहत आहेत. त्यामुळे एखादा चित्रपट बघून कोणीही पत्रिका बाबतचे प्रतिमा आपल्या मनात तयार करू नये. मी पाहिलेला धोबीघाट हा या चित्रपटात पेक्षा पूर्ण वेगळा आहे."
धोबीघाट बदलतोय - श्रीधर पुढे बोलताना म्हणाले की, "धोबीघाटला साधारण 130 ते दीडशे वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या जडणघडणीत, मुंबईच्या विकासात या धोबीघाटचा देखील खूप मोठा वाटा आहे. पण, हा धोबीघाट आता बदलतोय. पूर्वी जे काम लोक स्वतः आपल्या हाताने करायची त्याच्यासाठी आता मोठ्या मोठ्या वॉशिंग मशीन आल्यात. त्यामुळे लोकांची मेहनत थोडी कमी होऊन काम अधिक होऊ लागले. यातून त्यांना थोडे पैसे देखील अधिक मिळत आहेत आणि हळूहळू का होईना त्यांचे राहणीमान सुधारतंय."
4 पिढ्या पण हक्काची जागा नाही - "धोबीघाटची लोक मागच्या चार पिढ्यांचा हून अधिक काळ या भागात राहत आहेत. मात्र, त्यांना हक्काची जागा नाही. आत्ता जी जागा आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न अद्याप देखील आहेच. आपण जर एखाद्या ठिकाणी दहा वर्ष राहिलो तर ते ठिकाण आपल्याला आपलसं वाटू लागत. मात्र, ही लोकं तर चार पिढ्यांहुन अधिक काळ तिथे राहत आहेत. तिथेच त्यांचं काम चालतं. त्यामुळे उद्या काही झाल्यास या लोकांना हक्काची जागा असणे आवश्यक आहे." अशी प्रतिक्रिया धोबीघाट या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक के. एस. श्रीधर यांनी दिली आहे.
हेही वाचा - Iifa Awards 2022: सलमान ते शाहिद कपूरपर्यंत बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी