मुंबई - Priya Bapat now with Nawazuddin Siddiqui : सध्या वेब सिरीजसाठी सुगीचे दिवस आलेत. या माध्यमावर आता अनेक दिग्गज चेहरे दिसू लागले असले तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी खूप आधीपासून वेब सिरीज करीत आहे. किंबहुना कन्टेन्टचा खालावलेला स्तर आणि यावर झालेली कलाकारांची गर्दी पाहून नवाजुद्दीननं वेब सिरीजमधून छोटा ब्रेकदेखील घेतला होता. आता त्यानं एक थ्रिलर सिरीज साइन केली असून त्याची जोडी अभिनेत्री प्रिया बापट सोबत जमणार आहे. याची कथा नव्वदीच्या दशकातील असून शीर्षक अजून ठरायचे आहे. या सिरीजची निर्मिती विनोद भानुशाली करीत असून दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहे सेजल शाह.

प्रिया बापट मराठी चित्रपट, मालिका नाटकं यामध्ये वावरताना सुद्धा तिनं हिंदी वेब सिरीज 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये लीड रोल केलाय. सध्या तिचं रंगभूमीवर 'जर तरची गोष्ट' हे नाटक सुरु असून, ज्यात तिचा नवरा अभिनेता उमेश कामत तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. एक निर्माती म्हणूनही प्रिया कार्यरत आहे आणि तिने प्रोड्युस केलेली 'दादा एक गुड न्यूज आहे' आणि 'जर तरची गोष्ट' ही नाटकं प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. तर अशी ही हरहुन्नरी कलाकार प्रिया बापट आता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत आपल्या अभिनयाचे कंगोरे दर्शविण्यासाठी सज्ज झालीय.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनय क्षमतेबद्दल बोलायचे तर तो सीन स्टीलर म्हणून ओळखला जातो. आजवरच्या प्रत्येक भूमिकेत त्यानं वेगळेपण दिलंय. प्रिया बापट तिच्या व्यक्तिरेखेसाठी खूप तयारी करत आहे, ती नवाजुद्दीनसोबत वर्कशॉपही करत आहे. याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, "हा थ्रिलर सिरीज खूप मनोरंजक आहे. नव्वदीच्या दशकातील कथानक असून त्यात एक अतिरिक्त स्तर जोडला आहे. संहिता ऐकताक्षणीच मी होकार दिला होता. मला नवाजुद्दीनसोबत काम करायला मिळतेय हे माझ्यातील कलाकाराला समाधान देणारं आहे. त्यांच्यासोबत काम करताना रोज काहीतरी नवीन शिकायला मिळणार याची खात्री आहे. त्यांच्यासोबत हे कथानक जिवंत करण्यास मी उत्सुक आहे."

दिग्दर्शक सेजल शाह म्हणाली की, "प्रिया बापटच्या आगमनामुळे मला एका उत्तम अभिनेत्रीसोबत काम करण्याचा अनुभव मिळतोय. नवाजुद्दीन बद्दल बोलायलाच नको इतका तो टॅलेंटेड आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडलिया यांनी संहिता लिहिली असून त्यात थरार आहे, नाट्य आहे, सस्पेन्स आहे आणि प्रिया आणि नवजची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच फ्रेश आणि अनोखी आहे."
निर्माते विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शाह व भावेश मंडालीया आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेड व बॉम्बे फेबल्स द्वारा प्रस्तुत या मालिकेचं शूटिंग मुंबईत सुरु असून ते सलग ४० दिवस चालेल.
हेही वाचा -
2. सलमान खान स्टारर 'टायगर 3'नं जगभरात 400 कोटीचा टप्पा केला पार
3. सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील इफ्फीमध्ये मोशन पोस्टर रिलीज