मुंबई - नजीकच्या काळात म्युझिक सिंगल्स आणि त्यांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यातून अनेक प्रसिद्ध कलाकारही झळकताना दिसतात. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखड्याचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून त्यात मन उडू उडू झालं’चा अजिंक्य राऊत आणि ‘लागीरं झालं जी’ची शिवानी बावकर यांची रोमँटिक जोडी दिसणार आहे.
या गाण्याचा व्हिडिओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो अत्यंत देखणा झाला आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते. या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते.
‘नाते नव्याने’ हे गाणे मायरा आणि जय यांच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत. पण, नायक मात्र नायिकेसमोर त्या भावना मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडिओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.
“आम्ही या गाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग मराठीमध्ये केला आहे. गाण्याचा हा व्हिडिओ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात जाणार आहे. अशाप्रकारचे अनेक प्रयोग मराठीमध्ये करण्यास आम्ही बांधील आहोत. आमची पूर्ण खात्री आहे की, आमचा हा प्रयोग मराठी प्रेक्षकांना आमच्या याधीच्या प्रयोगांप्रमाणेच भावेल. याआधीच्या आमच्या प्रयोगांना रसिकांना उत्तम प्रतिसाद दिला होता,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एलएलपीचे संजय छाब्रिया यांनी काढले.
हेही वाचा - Actor Shah Rukh Khan : शाहरुख खानने खरेदी केला महिला क्रिकेट संघ! आता 'या' संघाचा असणार मालक