मुंबई - हिंदी मनोरंजन जगतातील चित्रपट निर्माता करण जोहरचा बहुप्रतिक्षित चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या सिझनचा काऊंट डाऊन सुरू झालाय. या शोचे प्रसारण 15 दिवसावर आलंय. हा वादग्रस्त चॅट शो गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीतील चाहत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. आता या शोच्या प्रीमियरच्या आधी करण जोहरनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शोचे तपशील उघड करत स्वत:चा एक फोटो शेअर केलाय.
सोमवारी त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत करण जोहरनं खुलासा केला की, या वेळी कॉफी मगचा रंग केशरीऐवजी लाल असणारेय. करण फोटोमध्ये स्टायलिश ब्लॅक सूट परिधान करुन आणि लाल मगसह एक डॅपर लुक देताना दिसतोय. त्यानं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तुमच्या आवडत्या स्टार्ससोबत कॉफीनं भरलेला नवीन गरम सिझन तयार करण्याची वेळ आलीय. कॉफी विथ करणचा 8 वा सिझन 26 ऑक्टोबरपासून डिस्ने हॉटस्टारवर सुरू होतोय.'
'कॉफी विथ करण'च्या आठव्या सिझनमध्ये दिसणाऱ्या सेलेब्रिटींबद्दल सांगितलं जातंय की, कार्तिक आर्यन शोमध्ये परत येणार आहे. त्याच्या शिवाय दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडीदेखील शोमध्ये पुन्हा झळकेल. अजय देवगण, रोहित शेट्टी, करीना कपूर खान आणि आलिया भट्ट सारखे इतर सेलिब्रिटी देखील शोच्या सेटवरील सोफ्यावर बसणार आहेत. त्याबरोबरच मिळालेल्या माहितीनुसार सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या द आर्चीज चित्रपटाचं त्रिकूटही कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये पदार्पण करणार आहेत. हा शो डिस्ने + हॉटस्टारवर 26 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होईल.
'कॉफी विथ करण' हा शो दरवेळ्या नव्या वादांचे कारण ठरत आलाय. या शोमध्ये करण फिल्म इंडस्ट्रीतील अनेक रहस्यांचा भेद करण्याचा प्रयत्न करतो. बोलण्याच्या ओघात सेलेब्रिटी काही तरी स्फोटक बोलून जातात आणि त्यावर पुढील अनेक दिवस चर्चा चर्वण सुरू राहतं. बॉलिवूडमध्ये नेपोटिझम असल्याचा दावा कंगना रणौतनं याच शोमध्ये केला होता. अनेक सेलेब्रिटींनी अनेक रहस्यांचा उलगडाही याच मंचावरुन केल्यानं बऱ्याचवेळा करण जोहरला टीकेचा धनीही बनावं लागलंय.
हेही वाचा -
1. Jai Ganesha Track From Ganpath : 'गणपथ'च्या 'जय गणेशा' ट्रॅकवर थिरकला टायगर श्रॉफ
2. Omg 2 : 'ओएमजी 2' छोट्या मुलांसाठी बनवल्याचा अक्षय कुमारचा दावा, पण 'ए' सर्टिफिकेमुळे फसला डाव