मुंबई - जेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जोर पकडला आहे तेव्हापासून एक चांगली गोष्ट घडलीय ती म्हणजे अनेक कलाकारांना चांगले काम मिळू लागले आहे. वेब सिरीज अथवा वेब फिल्म्स शक्यतो बॉक्स ऑफिसची चिंता करीत नाहीत त्यामुळे त्यात उगाचच फाफटपसारा नसतो. त्यातील कथा सविस्तरपणे मांडल्यामुळे अनेक प्रसंग असतात आणि त्यात अनेक कलाकारांची गरज असते. नेहमीच्या चित्रपटांमध्ये फारच कमी कलाकारांना संधी मिळत असते कारण त्यातील प्रमुख कलाकार जास्तीत जास्त फुटेज घेत असतात. परंतु वेब सिरीजमध्ये तसे दिसून येत नाही. कथानक जोरकस होण्यासाठी कस असलेले कलाकार निवडले जातात आणि त्यामुळेच अनेक होतकरू कलाकारांना काम मिळते. आता तर ओटीटीवर सुद्धा नवीन स्टार्स उदयास आले आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक गुणी कलाकार संधी न मिळाल्यामुळे अडगळीत पडलेले होते ते आता बऱ्याचदा महत्वपूर्ण आणि प्रमुख भूमिकांतून दिसून येताहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री करिष्मा तन्ना.
करिष्मा तन्नाचा अभिनय प्रवास - साधारण वीस बावीस वर्षांपूर्वी करिष्मा तन्नाने ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून आपला अभिनय प्रवास सुरु केला होता. परंतु आजही तिच्या नावे काही खास नाहीये. करिश्मा तन्ना रेड कार्पेटवर दिसत आली आहे. तिच्या लूक्स पासून तिच्या प्रोजेक्ट बद्दल नेहमीच चर्चा होतात. ती मॉडेलिंग करत होती आणि छोट्या पडद्यावरील काही रियालिटी शोजमधून ती झळकली आहे. बिग बॉस, खतरों के खिलाडी, नच बलिये, किचन किंग सारख्या शोज मधून तिने हजेरी लावली आहे. तसेच फेमस फ्रँचायझी नागीन ३ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच संजय दत्त चा बायोपिक संजू मध्ये ती एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती सुरज पे मंगल भारी आणि लाहोर कॉन्फिडेन्शियल या सिनेमांतून झळकली होती. परंतु करिष्मा आता ‘स्कूप’ नावाच्या वेब सिरीजमध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
करिष्माचा ड्रीम प्रोजेक्ट - ‘स्कूप’ चे दिग्दर्शन केले आहे हंसल मेहता यांनी आणि यात करिष्मा जागृती नामक जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. याचे कथानक तिच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. आजच्या काळातील लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा डळमळीत झाला असून त्यामुळे लोकशाहीला असलेल्या संभाव्य धोक्याविषयी ही मालिका बोलते. पत्रकारिता, पोलीस प्रशासन, न्यायपालिका आदींवर ही मालिका टिपण्णी करताना दिसेल. करिष्माच्या मते हा तिचा ड्रीम रोल आहे.
हेही वाचा - IIFA 2023: कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने सुहाना खानची केली प्रशंसा