देवमाणूस आणि देवमाणूस २ या मालिकांचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावरच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. या मालिकेतील इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे अगदी चोख बजावतोय.
मार्तंड जामकर यांच्या एंट्रीनंतर मालिका एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मार्तंड अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आपल्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेबद्दल मिलींद शिंदे म्हणाले, "मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. जास्तकरून खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला देवमाणूस २ या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे."
मिलिंद शिंदे पुढे म्हणाले की, “ही भूमिका माझ्यासाठी खास का आहे. माझी आधी इच्छा होती की मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंड सारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो."
हेही वाचा - बेसबॉल सामन्यापूर्वी प्रियंकाने घेतले निक जोनासचे चुंबन पाहा फोटो