मुंबई - दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे. बाईतलं बाईपण प्रभावीपणे मांडणारं संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असतं त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. त्यांचा प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो, तसेच ते जलदगतीने चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतीच साजिंदे नावाची एक वेबसिरीज बनविली असून ती रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
त्यांची चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड असते तीच धडपड साजिंदेचे कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले. त्यांची ही रोमँटिक वेबसिरीज 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'व्हीमास मराठी'च्या 'राडा राडा' या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकल्या होत्या. त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता त्यांची रोमँटिक वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे.
अभिनेत्री कश्मिरा ताकटे, अभिनेता ऋषिकेश वांबूरकर, अमित रेखी, अभिजित दळवी, ऋषिकेश पाठारे हे साजिंदे या वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर या वेबसिरीजमधून अभिनेत्री कश्मिरा हिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. या वेबसिरीजची कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत याची जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी स्वतः संभाळली आहे तर या वेबसिरीजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशी याने सांभाळली आहे.
याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे असे म्हणाले की, “एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी 'साजिंदे' या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. कथा माझ्याकडे तयार होती. कथा, दिग्दर्शनासह या वेबसिरीजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली आहे. एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता. 'साजिंदे' या वेबसिरीजला ओटीटीवर आणण्यासाठी 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मने उत्तम साथ दिली.”
हेही वाचा - Arpita Khan Birthday: फक्त सलमान खानचे वडीलच नाही तर या सेलिब्रिटींनीही घेतलंय मुलींना दत्तक