अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने दाक्षिणात्य चित्रपटांतून सुरुवात केल्यानंतर हिंदी टेलिव्हिजनविश्वात पाऊल टाकले. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘चितोड की राणी का जोहार’ मध्ये राणी पद्मिनी साकारल्यानंतर आता ती पहिल्यांदाच एका मराठी मालिकेत भूमिका साकारतेय. देवमाणूस २ या मालिकेत ती आमदार बाईची भूमिका वठवीत आहे.
देवमाणूस या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचेही कथानक उत्कंठावर्धक असून त्याला प्रेक्षकांचा भक्कम पाठिंबा मिळतोय. ‘देवमाणूस २’ ही मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या एंट्री नंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे. पण देवमाणूस या मालिकेत क्षणाक्षणाला प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का मिळतो आहे. अशातच मालिकेत अजून एक ओळखीचा चेहरा एक महत्वाची भूमिका निभावताना दिसतोय. मालिकेत आमदार बाईची भूमिका साकारणारा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी साकारते आहे.
आमदारबाई सोबत डील करण्यासाठी अजित आणि डिम्पल जातात पण तिचा रुबाब आणि वागणं पाहून दोघेही धास्तावतात. आमदार बाई खूप डेंजर आहे असं डिम्पल अजितला सांगते. या आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, "देवमाणूस मध्ये मी आमदार देवयानी गायकवाड ही भूमिका निभावतेय. देवयानी हे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे आणि ती तिचं काम करत असताना तिच्या वाकड्यात जर कोणी शिरलं तर ती त्या व्यक्तीला सोडत नाही हे ती वारंवार दाखवून देते. त्यामुळे गावात तिचा दबदबा आहे.”
तेजस्विनी पुढे म्हणाली की, “‘राणी पद्मिनी’ या मालिकेनंतर मी अनेक चित्रपट केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर देवमाणूस ही माझी पहिलीच मराठी मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करण्याच्या अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. माझे सगळे सहकलाकार खूपच पॉझिटिव्ह आहेत. सगळ्यांसोबत अजून माझे सीन्स झाले नाही आहेत पण सीन्सच्या आधी मला रिहर्सलमध्ये सगळे खूप मदत करतात. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं."
हेही वाचा - मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा ३४ वा वाढदिवस