मुंबई - बॉलिवूड स्टार विकी कौशल त्याच्या पुढच्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी म्हटले आहे. ऐतिहासिक भूमिकेसाठी विकी कौशल हा योग्य पर्याय असल्याचे दिग्दर्शक उत्तेकरांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आहेत. या भूमिकेसाठी त्याने विकीची निवड का केली याबद्दल बोलताना, लक्ष्मण यांनी सांगितले, 'विकीचे व्यक्तिमत्त्व, जसे की त्याची उंची आणि शरीरयष्टी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी मिळतीजुळती आहे. तो एक उत्कृष्ट कलाकार आहे. आम्ही कोणतीही लुक टेस्ट केली नाही, मला खात्री होती की तोच छत्रपती संभाजींची भूमिका करू शकतो.'
या भूमिकेसाठी, विकीच्या पुढे एक कठीण काम आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेता विकी कौशलला या भूमिकेसाठी सखोल प्रशिक्षण दिले जाईल. चार महिने विकी तलवारबाजी, घोडेस्वारी आणि इतर काही गोष्टींचे प्रशिक्षण घेणार आहे. भूमिकेसाठी आवश्यक असलेली भौतिकता त्याने प्राप्त केल्यानंतर निर्माते पीरियड ड्रामाचे शूटिंग सुरू करतील.
छत्रपती संभाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला उत्सुक असल्याचे सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक म्हणाले. 'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट पाहिले आहेत, पण छत्रपती संभाजी महाराज किती मोठे योद्धे होते किंवा मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे योगदान कोणालाच माहीत नाही,' असे उतेकर पुढे म्हणाले.
चित्रपट प्री-प्रॉडक्शन स्टेजवर असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शूटिंग सुरू होईल, असे दिग्दर्शकाने सांगितले. शीर्षक नसलेल्या चित्रपटाला दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सचा पाठिंबा आहे, ज्यांच्यासोबत उतेकरने भूतकाळात लुका छुप्पी आणि मिमी या दोन यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उतेकर यांनी खुलासा केला की, सध्या त्यांच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटावर पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे ज्यात विकी कौशल आणि सारा अली खान आहेत. चित्रपट तयार आहे, एप्रिलमध्ये तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांवर मराठीमध्ये अनेक नाटके आली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी ही लोकप्रिय मालिकाही खासदार अमोल कोल्हे यांनी बनवली होती. मात्र आजपर्यंत बॉलिवूडमध्ये या ऐतिहासिक विषयावरील भव्य चित्रपट बनलेला नाही. विकी कौशल हा सक्षम अभिनेता आहे. तो या भूमिकेला न्याय देण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशभरातील लोकांसमोर समर्थपणे जाऊ शकेल. लक्ष्मण उत्तेकर हे उत्तम जाण असलेले मराठमोळे बॉलिवूड दिग्दर्शक आहेत. ते या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच एका भव्य ऐतिहासिक कलाकृतीच्या निर्मितीला हात घालत आहेत.